वलय (कादंबरी)

वलय - प्रकरण ८

सोनीला तिसऱ्या दिवशी तिच्या रूमवरच्या इंटरकॉमवर हॉस्टेलच्या ऑफिसमधून फोन आला.

"आपकी मदर आई है. ऑफिस में बैठी है!"

"आई? आत्ता? अशी अचानक कशी आली?" असा विचार करत ती म्हणाली, "ठ ठीक है, भेज दो उनको अंदर!"

"नही, वे अंदर नही आयेंगी. आपही को बाहर बुलाया है!"

सोनी थोडी साशंक विचारांनी बाहेर जायला निघाली.

"आई जवळ फोन आहे पण तिने फोन केला नाही. मला निघतांना किंवा पोचल्यावर कॉल केला नाही? काय झालं असेल? अशी अचानक का आली ही?"

तिच्या रूम मधून बाहेर निघून ती हॉस्टेलच्या कॉरिडॉरमधून चालू लागली.

हॉस्टेलमधल्या बहुतेक मुली मोकळ्या कपड्यांत इकडून तिकडे फोनवर बोलत फिरत होत्या.

काही जणी आपल्या लॅपटॉपमध्ये तोंड खुपसून बसल्या होत्या तर काही भर दुपारी झोपल्या होत्या.

पायऱ्या उतरून ती हॉस्टेलच्या ऑफिसमध्ये आली. एका बेंचवर आई बसलेली होती. बाजूला एक मोठी सुटकेस ठेवलेली होती आणि बाजूला आणखी एक बॅग!

सोनी दरवाजात दिसताच आई ताडकन उठून उभी राहिली आणि सोनी तिच्या जवळ जाताच तिने सोनीच्या कानाखाली तीन फटाफट लगावून दिल्या.

सोनी त्यातून सावरून काही म्हणणार त्याआधीच तिची आई म्हणाली, "तुझे आमच्याकडे असलेले सगळे उरले सुरले सामान या मोठया सूटकेस मध्ये आहे. जे काय असतील नसतील ते दागिने आहेत. कपडे आणि तुझ्या आवडीच्या वस्तू पण आहेत."

"अगं आई, काय झालं सांगशील तर खरं? तू अचानक गावाकडून इथे न सांगता का आलीस? आपला पप्प्या काका कसा आहे? शेजारच्या सुलीचं काय चाल्लंय आजकाल?"

"जास्त नाटकं करू नगंस! नाच करता करता नाटकं पण करायला लागलीस व्हंय? लई झालं तुझं नाचाचं कवतीक! नाच काय कमी होता की काय सटवे, म्हणून आता स्वताचे नंगे फोटू टाकाया लागलीस त्या फिन्दऱ्या काळकुंद्र्या इंटरनेटवर?"

मग सोनी पण तिच्या गावाकडच्या मूळ भाषेत बोलू लागली.

"आई, आत्ता लक्षात आलं की कुणी दावला असंल तुला त्यो माझा नंगा फोटू? मला माहीत आहे, पप्प्या काकानंच तुला ते दाखवलं असणार, तुझ्या मनात कायबी वंगाळ घातलं असणार!"

"आगं खुसमटे, निदान त्यानं मला दावलं तरी! तव्हा समजलं की आपली दिवटी डान्सच्या नावाखाली काय दिवे लावते आहे ते!"

"आई, लय शाना झालाय तो काका! त्याला विचार की जरा, त्यो काय करतूया दिवसभर मोबाईल वर?"

"जुबान लडवतेस व्हय चिलटे! आज त्यो काका हाय म्हनून तू एवढी मोठी झाली. नाहीतर तुझा बा गेल्यावर आपल्याला काय काय सहन कराया लागलं व्हतं, ठाव हाय ना? आता त्यो दारू पित फिरतो पन आधी त्यानंच आपल्याला सावरलं. आज तुजा बा असता ना, तर तुझे हे असले नंगे फोटो पाहून जिता मेला असता त्यो!" असे म्हणून ती पदर डोळ्याला लावून अश्रू पुसू लागली.

सोनी शांत होती पण वेगवेगळ्या विचारांनी तिचे डोळे सैरभैर फिरत होते.

ती मनात विचार करू लागली, "मी माहिन्याला पैसे पाठवते ते मात्र कसे गोड लागतात हिला आणि काकाला?"

तिची आई पुढे म्हणाली, "आता बास! तुझा कार्यक्रम आपल्या गावात जे जे लोक पाहात होते त्यांनी तो बघणा सोडलाय! तू आता गावात येऊ नगंस! आलीस तर मी सरपंचाला सांगून बदडून काढायला लावंन तुला! काय समजतीस व्हय स्वताला? यापुढे तुजा आपला आणि गावाचा संबंध संपला! तू, तुझं फिलिम, आनं डान्सचं याड सोडणार नाही, मला ठाव हाय. पण, म्या तुला सोडलं हाय कायमचं!"

"ठीक आहे, फोटोमुळे माझे गावातले हजार वोट गेले तर हरकत नाही, शहरांमधून मला लाखो वोट मिळतील. सांग तुझ्या त्या बुरसटलेल्या विचारांच्या गाववाल्यांना! मला तुमची गरज न्हाय म्हनावं! आनं त्यो काका? त्यो कसला काका गं? माझ्यावर नेहेमी वाईट नजर ठेऊन असतो, त्याला काय बोलत नाय तू? दारु पित फिरतो गावभर! काम थोडं आन् सोंगंच लई हायेत त्याची! मला बी गरज नाय तुमची आन् तुमच्या गावाची!"

"ठीक आहे. पन् लक्षात ठेव पोरी! पस्तावशील तू एक दिवस! लई पस्तावशील. निघते मी आता! हां पण माहिन्याला पैका पाठवायला विसरू नगंस हां!"

"हां हां. जा. जा निघून आन्ं बैस सोबतीला घिऊन त्या काकाला गावातल्या हिरीजवळच्या झाडाजवळ! काय त्यो काका आन्ं काय त्ये गांव! पन एक ध्यानात ठेव! मी तुला पैका देत जाईन! पण तो त्या काकाला द्यायचा नाय, काय? कळलं का? दारूत फुकंल तो सगळा पैसा!"

आई रडत रडत निघून गेली.

तिने एक क्षणसुद्धा मागे वळून पाहिले नाही. सोनीला सुद्धा त्याचे काही विशेष वाटले नाही. कारण तिच्या आईने तिच्या वडलांच्या मृत्यूनंतर तिला हळूहळू दूर केले आणि तिच्या काकाला जवळ केले होते.

सुटकेस घेऊन रूममध्ये जाता जाता तिला एका मागून एक असे अनेक जुने दु:खद प्रसंग आठवायला लागले.

पण ती मनात म्हणाली, "सोनी मॅडम, सावरा स्वतःला! विसरा ते आता आणि आपल्या डान्स काँपिटिशन कडे लक्ष द्या! यु हॅव लाँग वे टू गो!"

क्रमशः
 
खूपच मस्त सॉलिड लिहिले आहे पुढची पोस्ट वचन्यास फार उत्सुकता लागली आहे
 
thanks%20patience.jpg
thanks%20you.jpg
icone_dhanywad.jpg
धन्यवाद
 
वलय - प्रकरण ९

मुंबईच्या क्वीन्स नेकलेस म्हणजेच मरीन ड्राईव्ह परिसरात अनेक उंच इमारती दिमाखात उभ्या होत्या. त्या परिसरात असणारे बॉलीवूड मधल्या प्रसिद्ध कलाकारांचे बंगले, त्यांचा तेथला वावर आणि परिसरातला समुद्र हे सगळं एकूणच त्या परिसराबद्दल जनसामान्यांच्या मनात नेहमी कुतूहल आणि आकर्षण निर्माण करत होतं. जवळचा फेसाळणारा अरबी समुद्र आणि मुंबईचा देखणा नजारा तेथील अनेक इमारतींच्या खिडकीतून सहज दिसायचा. रोज सायंकाळी ते दृष्य बघणे म्हणजे डोळ्यांना एक पर्वणीच होती.

"स्टार अपार्टमेंट" च्या अकराव्या मजल्यावरच्या फ्लॅटमधील अशाच एका खिडकीतून रागिणी बाहेर बघत होती. तो फ्लॅट सूरजचा होता. त्याने तो नुकताच घेतला होता. स्वत:च्या हिमतीवर! तेथे तो एकटाच रहायचा. सूरजचे आई वडील मुंबईतच दुसरीकडे बंगल्यात राहात होते. गेल्या काही महिन्यांत सूरजने त्याच्या बिझिनेस मध्ये वेगाने प्रगती केली होती. आज सूरज अजून ऑफिसमधून यायचा होता. दोन तीन दिवस झाले रागिणी सूरजच्या फ्लॅटवर रहात होती. तिच्या हॉरर सिरियल्सचे पुढचे शूटिंग काही दिवसानंतर होणार होते. सूरज सोबत आताशा तिची चांगलीच जवळीक वाढली होती. दोन बेडरूमचा प्रशस्त हॉल असलेला तो फ्लॅट होता.

बराच वेळ समुद्राकडे आणि क्वीन्स नेकलेसच्या बाजूला रस्त्यावरून जाणारी वाहने बघून झाल्यानंतर तिने गुलाबी कलरचा खिडकीचा पडदा बंद केला आणि "चॅटस अॅप" वर सूरजला मेसेज केला, "व्हेन आर यू कमिंग होम माय लव्ह?"

सूरज आफलाईन दिसत होता. तिने मोबाईल ठेऊन दिला. सूरज आल्यावर त्याचेसाठी ती "हाफ बेक्ड ऑम्लेट" आणि कॉफी बनवणार होती. तशी तयारीही तिने करून ठेवली होती. मनात राहुलच्या धमकीबद्दल थोडी भिती होतीच पण ते विसरायचे ठरवून तिने टीव्ही लावला.

टीव्हीवर सोनी बनकरच्या सेल्फिबाबत न्यूज चवीने चघळल्या जात होत्या.

गालात हसत रागिणी म्हणाली, "ये लडकी सुधरेगी नहीं. क्या जरुरत थी इसको ऐसा करने की? इतना अच्छा खासा टॅलेंट है बंदी में, फिर भी न जाने क्यों ऐसा करती रहती है ये लडकी!" प्रथम तिच्या मनात सोनीला फोन करण्याचा विचार आला पण तिने तो विचार बदलला.

सध्या ती स्वत:च्या आयुष्याचा जास्त विचार करणार होती. थोडावेळ चॅनेल बदलत बदलत तिने टीव्ही बंद करून टाकला. "चॅटस अॅप" च्या मेसेज विंडो मध्ये टक् टक् झाली आणि तिने मोबाईल चेक केला. आता तो ऑफिस मधून निघाला होता. त्याचा तो मेसेज पाहून तिला आनंद झाला. ती पटकन उठली. बाथरूम मध्ये जाऊन तिने शॉवर ऑन केला. आपण सूरज समोर आज अधिकाधिक आकर्षक कसे दिसू शकू याचाच विचार ती आंघोळ करतांना करत होती.

प्रथमच दोन पूर्ण दिवस ती सूरज सोबत फ्लॅटवर रहायला आली होती. सूरज तिला पहिल्या भेटीपासूनच आवडला होता...
 
वलय - प्रकरण १०

तिला त्या दोघांची पहिली भेट आठवली.

हॉरर सिरीयल्सचे टीव्हीवरील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि प्रोड्युसर डी. पी. सिंग यांच्या, रागिणी काम करत असलेल्या "डर का सामना" या सिरीयलचे शंभर एपिसोड्स पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी "द शिप" नावाच्या (जमिनीवरच असलेल्या) एका हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली होती. सुप्रिया आणि सोनी या दोघींना रागिणीने पार्टीला बोलावले होते पण शूटिंगच्या डेट्स असल्यामुळे त्या येऊ शकल्या नव्हत्या. त्या पार्टीला सिरियलचे प्रायोजक, कलाकार, तंत्रज्ञ, पत्रकार आणि बॉलीवूडमधील काही कलाकार सुद्धा उपस्थित होते. सुभाष भट सुद्धा त्यात होते.

त्यांचे लक्ष रागिणी कडे होते. रागिणीच्या त्या सिरियलचे काही एपिसोड्स त्यांनी बघितले होते. तिची अॅक्टींग त्यांना आवडली होती. सुभाष भटनी तिला आणि डी. पी. सिंग यांना जवळ बोलावून काही गप्पा मारल्या. त्यांच्या मनात हॉलीवूडच्या तोडीचा हॉरर चित्रपट भारतात बनवायची इच्छा होती. अजून कथा निश्चित झाली नव्हती पण त्यांचा शोध सुरू होता. रागिणीला त्यांनी चित्रपटात घेण्याविषयी तसे स्पष्ट सांगितले नाही पण त्यांनी स्वतः रागिणीला एवढा वेळ देणं हीच एक मोठी बाब सगळेजण मानत होते. मात्र सुभाष भटच्या मनातले हे सगळे प्लान रागिणीला माहिती नव्हते. पार्टीतील काही जणांच्या हातात सॉफ्ट ड्रिंक्स तर काहींच्या हातात हार्ड ड्रिंक्सचे ग्लासेस होते.

थोड्या वेळानंतर पार्टीत डी. पी. सिंग यांचा मुलगा सूरज सिंग हासुद्धा हजर झाला. त्याने त्याचा स्वतंत्र बिझिनेस सुरू केला होता. डी. पी. सिंग यांनी रागिणी आणि इतरांशी त्याची ओळख करुन दिली. सूरज शक्यतो अशा सिरियल्स वगैरेच्या पार्ट्यांना येत नसे. पण आज अपवाद होता. कारण कदाचित सूरजच्या त्या पार्टीला पार्टीला येण्याने रागिणीच्या पुढच्या आयुष्याला त्यामुळे एक वेगळी कलाटणी मिळणार होती का?

रागिणीने घातलेले चमकदार निळे टॉप आणि निळा मिनी स्कर्ट तिला त्यादिवशी खूप शोभून दिसत होता. तर सूरजने करड्या रंगाचा पार्टी वियर शर्ट आणि निळी जीन्स घातली होती. रागिणी शक्यतो निळ्या रंगाचे कपडे घालायची.

डी. पी. सिंग म्हणाले, "रागिणी, मिट माय सन सूरज! आणि सूरज, धिस इज रागिणी! अवर ग्रेट अॅक्टर अँड सेवींग ग्रेस ऑफ अवर सिरियल!"

हाय हॅलो झाले. शेक हँड झाले. रागीनीचे लक्ष सूरजच्या व्यक्तीमत्वाकडे गेले आणि ती भारावून गेली. सूरजने जिम मध्ये जाऊन बॉडी कमावली होती. त्याने डोक्यावर अगदी कमी केस ठेवले होते. हाफ स्लीव्ह शर्टातून त्याचे हातावरचे आणि मनगटावरचे पिळदार हिरवे स्नायू दिसून येत होते आणि त्याने व्यायाम करून शरीर चांगलेच कमावलेले असेल हे त्यातून अधोरेखित होत होते. त्याचे रुंद खांदे आणि बोलण्यात एका प्रकारची जंटलमनची अदब, स्त्रियांशी आदराने वागण्याची पद्धत यावर रागिणी भाळली. आजच्या पार्टीत तो अगदी आक्रमक आणि प्रभावशाली वाटत होता.

सूरज सुद्धा रागिणीच्या ठळक, उठावफदार स्त्रीत्वाकडे आणि एकूणच तिच्या रूपाकडे आणि व्यक्तिमत्वाकडे आकर्षला गेला.

सूरजचे वडील पुढे म्हणाले, "सूरज त्याचा स्वतःचा बिझिनेस करतो आहे. फार कमी वयात त्याने खूप प्रगती केली. तो आणि त्याचे मित्र मिळून भारतात अल्पावधीत एक मोठी फूड चेन सुरू केली. अजून त्यांना बरीच मजल गाठावयाची आहे. पण सो फार आय एम हॅप्पी विथ हिज प्रोग्रेस! देशात आणि परदेशात अनेक ब्रांचेस आहेत आणि एशियन फूड जगाच्या सगळ्या काँटिनेंटमध्ये पोचवायचे आहे त्याला! हॉटेल मॅनेजमेंट मध्ये त्याने करीयर करायचं आधीच ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे त्याने केलं, देश विदेशात अनेक प्रकारचे कोर्सेस केले, अनेक संशोधन केले, अनुभव घेतला आणि आज हा यशस्वी सूरज आपल्यासमोर उभा आहे!"

सूरजने ही प्रशंसा स्वीकारत रागिणीकडे बघून डोळे मिचकावले.

"नाईस टू हियर धिस सूरज. ग्रेट! अँड बेस्ट लक फॉर युवर फ्यूचर! मे ऑल युवर विशेश कम ट्रू!" रागिणी म्हणाली.

सिंग पुढे म्हणाले, "आणि रागिणी बद्दल काय बोलायचं? जेम आहे, हिरा आहे हिरा! अगदी मनापासून आणि समरसून ती अभिनय करते. बरेच लोक म्हणतात, हॉरर सिरियल्स मधील अॅक्टींग ही खरी अॅक्टींग नाही, पण तिने ते खोटे ठरवले. तिने या सिरियल मध्ये जान आणली जान! हॉरर सिरियल्सला एका ठराविक प्रकारचे प्रेक्षक मिळतात असे मानले जाते पण रागिणीने ते खोटे ठरवले. या सिरीयलला खूप प्रेक्षकवर्ग लाभला आहे! "

तेवढ्यात तेथे त्या सिरियल मधील मुख्य पुरूष पात्र (मेल लिड) प्रतिक श्रीवास्तव आला आणि पुन्हा ओळखपाळख सुरू झाली. पण नंतर सूरज आणि रागिणी एकमेकांशी बराच वेळ बोलत बसले. या दोघांना एकमेकांशी बोलायला आवडायला लागले होते. का कोण जाणे, त्यांच्यात पहिल्या भेटीपासूनच एक सुप्त आकर्षण निर्माण झाले आणि दोघांकडून सारखाच साद आणि प्रतिसाद मिळत होता.

पार्टीत मग म्युझिक, डान्स सुरू झाले. सूरजची सोबत नाचण्याची विनंती रागिणीने मान्य केली.ती पार्टी रागिणी कधीही विसरू शकणार नव्हती, कारण त्यानंतरच तर त्यांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेणे सुरु केले. डेटिंग सुरु झाले..
 
वलय - प्रकरण ११

आणि पार्टीतला तो सूरजसोबतचा डान्स आठवतांना रागिणीच्या लक्षात आले की विचाराविचारांत तिला आंघोळीला बराच वेळ झाला होता आणि दारावरची बेल वाजायला लागली होती. सूरज आला होता!

सूरज जवळ फ्लॅटची एक चाबी होती. पण रागिणी घरी असल्याने त्याने दोन तीन वेळा बेल वाजवली पण प्रतिसाद आला नाही म्हणून त्याने चाबीने दरवाजा उघडला तेवढयात रागिणीसुद्धा घाईत दरवाजा उघडायला फक्त अंगावर ब्रा आणि कमरेवर टॉवेल गुंडाळूनच बाथरूमच्या बाहेर आली. त्याने फ्लॅटचा दरवाजा बंद केला आणि तिला तिची अर्धवट कपड्यांत बाथरूम बाहेर येण्याची "चूक" लक्षात आली. ती थोडी ओशाळली आणि मग लाजेने लाल झाली.

सूरजची नजर मात्र तिच्यावरून हटत नव्हती. अचानक घरी आल्यावर रागिणीचे अर्ध अनावृत्त सौंदर्य समोर आल्याने तो उत्तेजित झाला. त्याने सूचक नजरेने स्मितहास्य करत तिच्याकडे पाहिले तसे तीसुद्धा काय ते समजली. त्याने कोट काढून फेकला आणि टाय सैल केला. मात्र लाज वाटून रागिणी पटकन माघारी वळून पुन्हा बाथरूमकडे जायला लागली तेवढ्यात तिच्या उघड्या कमरेभोवती सूरजचा हात पडला, तिला त्याने मागे ओढले आणि तिच्या मानेचे मागच्या बाजूने चुंबन घेतले. आता तीही अंगभर मोहोरली आणि मग उत्तेजित झाली...

तिने थोडासा खोटा प्रतिकार केला पण मग स्वत:ला त्याच्या पूर्णपणे स्वाधीन केले.

नंतर पुढचा एक तासभर बाथरूम मध्ये शॉवरखाली ती दोन शरिरं एकमेकांना पूर्ण ओळखण्याचा प्रयत्न करत होती.

शेवटी एका प्रेमाच्या अत्युच्च क्षणी ती ओळख पटली. ओळख पटेपर्यंत दोघांच्या शरिरात जे वादळ पेटले होते ते आता शमले. आता एकमेकांसमोर कसलीच लाज आणि कसलाच संकोच नव्हता. वस्रांसोबत लाज आणि संकोच पण गळून पडलेले होते आणि पाण्याबरोबर वाहून गेले होते...
 
वलय - प्रकरण १२

संध्याकाळी साडेसात वाजता दोघे बेडवर एकमेकांच्या पायात पाय अडकवून बाहुपाशात बसलेले होते.

न बोलता.

शांत. निवांत.

"मी कॉफी बनवून आणते!", रागिणीने शांतता भंग केली.

"थांब. बैस अजून! अशीच मला चिटकून बाहुपाशात बसून रहा! तुला क्षणभरसुद्धा दूर होऊ द्यावेसे वाटत नाही!" सूरज तिला आणखी छातीशी ओढत म्हणाला.

"मिस्टर सूरज सिंग! आता प्रेम बास झालं! थोडं प्रेम उद्यासाठी राहू द्या!", असे म्हणत तिने जवळ पडलेली ब्रा उचली आणि घालायला सुरुवात केली.

"ओके रागिणी जी! जशी आपली मर्जी!", असे म्हणून त्यानेही एकेक कपडे अंगावर चढवायला सुरुवात केली.

तो पुढे म्हणाला, "रागिणी, मला तुला काहीतरी सांगायचे आहे!"

रागिणीने टॉप घातला आणि म्हणाली," कॉफी पितांना बोलू! ये बैस डायनिंग टेबलवर. मी ऑमलेट आणि कॉफी बनवून आणते."

डायनिंग टेबलवर ऑमलेट आणि कॉफी घेतांना सूरजने म्हटले-

"तू माझ्याकडे नेहमीकरता फ्लॅटवरच राहायला ये रागिणी!"

तिच्या पूर्वायुष्यातील सगळ्या घटना त्याला अजून सांगायच्या की नाही याबद्दल तिची द्विधा मनस्थिती होत होती. तसे तिनेही त्याला त्याच्या भूतकाळाबद्दल जास्त विचारले नव्हते आणि आता हा फ्लॅटवर राहायला ये म्हणतो आहे?

ती विचारात पडली.

"यावं का याचेसोबत रहायला? सोबत राहून एकमेकांना आणखी काही वर्षे ओळखून मग पुढचा विचार करता येईल.

पण हा माझा विचार झाला. त्याच्या मनात नेमके काय आहे? पण मनातले नेमके सगळेच एकदम एकमेकांना आताच एकमेकांना सांगितले पाहीजे का?

हळूहळू एकमेकांबद्दल माहिती होण्यात जी मजा आहे ती एकदम सगळे पूर्वायुष्य एकमेकांना भराभर सांगून मोकळे होण्यात नाही!

अशाने आयुष्य बेचव होतं! आणि भूतकाळाला महत्व तरी किती द्यायचं?

मेंदूत भूतकाळ एक स्मृती म्हणून साठवलेला असतो, बाकी भूतकाळाचे अस्तित्व असते तरी कुठे?

जास्तीत जास्त फोटो आणि व्हिडिओद्वारे भूतकाळाचे क्षण आपल्याकडे असतात पण तेही काय असतं? एक मेमेरीच!

आता मी जे सुख अनुभवले ते कधी रोहन सोबत अनुभवलेच नव्हते. अनुभवणार होते त्या आधीच रोहनचा अपघात झाला आणि राहूल तर या सुखासाठी माझ्यावर टपूनच बसला होता आणि आता तर तो फोनवरून...!"

नंतर तिला आठवला, सोहमचंद्र, तिचा नवरा! नावालाच नवरा होता तो!!

त्याचे सोबत लग्न झाल्यानंतरचे एकेक दिवस आणि एकेक रात्री नरकात असल्यासारखे ती जगली होती. कुठे सोहम सोबत अनुभवलेले ते किळसवाणे आणि तिच्याकडून त्याने फक्त सुख ओरबाडून घेण्याचे ते सेक्सचे क्षण आणि कुठे हा आजचा सूरजने तिला दिलेला हळुवार तरल अत्युच्च सुखाचा अनुभव!!

काही तुलनाच होऊ शकणार नाही! सोहमसोबत तिने फक्त आणि फक्त दु:खच अनुभवले होते. पण सूरजने आज ज्या सफाईदारपणे प्रेमाक्रीडा केली त्यावरून तो या खेळात नवखा वाटत नव्हता.

कॉलेजमध्ये मैत्रिणींसोबत हसत खिदळत या विषयावर चर्चा केल्याचे तिला आठवत होते, पुरुषाने असे केले तर ओळखायचे की त्याने आधी "अनुभव" घेतलाय आणि तसे केले तर ओळखायचे की तो "हे" प्रथमच करतोय वगैरे वगैरे!! ...

पण आताच या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आहे का? राहूलच्या ब्लॅकमेलिंगबद्दल सूरजला आता सांगावे का? असे एक ना अनेक विचार तिच्या मनात चालले होते.

"अरे, हे काय? एका चांगल्या क्षणी मी हा कसला भूतकाळाचा विचार काय बसलेय? आताच हे सगळे आवश्यक आहे का?" रागिणी मनात म्हणाली.

ती अचानक गहन विचारांत गढली आहे हे पाहून सूरजने चुटकी वाजवून तिला विचारले, "मॅडम! मी फक्त विचारले की माझ्याकडे राहायला येतेस का, तेवढ्यावर एवढा मोठा विचार करतेस?"

"अं, हो हो, म्हणजे न न नाही!"

"अगं, काय हो आणि काय नाही?"

ती भानावर येऊन हसली आणि म्हणाली, "नाही यासाठी की मी कोणताच मोठा विचार करत नाही आहे आणि हो यासाठी की मी तयार आहे, तुझ्यासोबत राहायला!"

तिने स्वतःच्या नकळत होकार कळवला. आता तिच्या मनात थोड्यावेळापूर्वीचा त्यांचा बाथरूम मधील प्रेम प्रसंग रेंगाळत होता. तिच्या आयुष्यातला पहिला "खरा सुख देणारा" तो सेक्स होता पण मग सूरजचाही हा पहिलाच सेक्स असेल का? तिला पुन्हा असे वाटून गेले पण मग तिने विचारांची दिशा बदलवली.

तिच्या होकारामुळे सूरज खुश दिसला, म्हणाला, "चला बाहेर डिनर करूया! कमऑन गेट रेडी! तू लवकरच शिफ्ट हो इकडे! आता नो मोअर लेडिज होस्टेल. नो मोअर लोकल ट्रेन, नो मोअर बेस्ट बसेस!"

"म्हणजे?"

"म्हणजे मी तुझ्यासाठी एक कार घेतली आहे. खाली उभी आहे! ही त्याची चाबी!" टेबलावरची एक चाबी उचलून तिला देत तो म्हणाला.

तिने आश्चर्याने दोन्ही हात तोंडावर नेले. तिचे डोळे विस्फारले गेले.

"ओह माय गॉड! म्हणजे आपण सोबत राहाण्याबद्दलचा माझा होकार गृहीत धरला होतास तर! यु रिड माय माइंड, नॉटी! पण गाडीची आवश्यकता नव्हती, म्हणजे मी काही काळानंतर घेणारच होते रे! आणि मी समजा सोबत राहायला नाही म्हटलं असतं तर?"

"पण परंतु ची ही वेळ नाही. मी तुझं काहीच ऎकणार नाही, मॅडम! आय नो यु वेल. तू नाही म्हटलं नसतंच. टेक युर कार अँड लेट अस एन्जॉय अवर लाईफ अहेड टुगेदर!" हसत हसत सूरज म्हणाला.

"यु आर सिम्पली ग्रेट सूरज!"

"आठ दिवसांनी कारच्या सगळ्या फॉरमॅलिटिज आणि डॉक्युमेंट्स पूर्ण होतील. तोपर्यत येथेच राहा. ऑफिसला जातांना मी माटुंग्याला तुला सोडून देत जाईन माझ्या कारने! मग त्यानंतर नव्या कारनेच जा होस्टेलमध्ये तुझा सामान घ्यायला. सरप्राईज दे तुझ्या दोन्ही रूम पार्टनर्सला!"

(क्रमश:)
 
वलय - प्रकरण १३

आठ दिवसांनी कारने रागिणी हॉस्टेलवर गेली.

सोनी बाहेरच कट्ट्यावर सिगारेट पित बसली होती.

"ओह माय गॉड सोनी. तू सिगारेट प्यायला लागलीस? सो बॅड!"

सोनी उठून उभी राहिली पण तीने सिगारेट पिणे चालूच ठेवले आणि निराशेने ती म्हणाली, "केव्हा आलीस? खूप वेळ लावलास या वेळेस रागिणी?"

"हो. मी आता सूरज सोबत त्याच्या फ्लॅटवर शिफ्ट होणार आहे. लिव्ह इन रिलेशनशिप! त्याने मला एक कारसुद्धा भेट दिली आहे! बाहेर उभी आहे." सोनी जवळ कट्ट्यावर बसत रागिणी म्हणाली.

"वाव! ग्रेट. अभिनंदन!" कोरडेपणाने धूर उंच हवेत उडवत सोनी म्हणाली.

"कमऑन सोनी. काय झालं तुला? अशी कोरडी का वागते आहेस? एनिथिंग राँग? सुप्रिया आली का परत की अजून पुण्यालाच आहे?"

"सुप्रिया अजून पुण्याहून परत आलेली नाही. जाण्याआधी ती खूप उदास दिसली. तिचा राजेश सोबत ब्रेकप झालाय! रात्रभर तिच्या रूम मधून हुंदक्यांचा आवाज येत होता त्या दिवशी! मी तिला विचारले पण जास्त काही न सांगता तिने राजेश सोबत ब्रेकअप झाल्याचे सांगितले आणि मग म्हणाली मला एकटे सोड! ती बहुतेक आता तिचा सामान घेऊन जाईल असं तिच्या बोलण्यावरून वाटलं. ती पुण्यालाच राहील असं दिसतंय."

"व्हाट? त्या दोघांकडे पाहून वाटत होतं की ती लवकरच लग्न करतील!"

"हो ना. मी तिला कॉल केला पण उचलत नाहीए ती. मेसेजचा रिप्लाय पण करत नाही. एनिवे जे असेल ते असेल. तिच्याकडे फक्त एकच सिरीयल आहे!"

"मग हे तुझ्या नाराजीचं कारण आहे की काय?"

"अगं नाही गं! आणि मी डान्स फिनाले हरले गं! अगदी शेवटचा नंबर आला!"

"अरे हो! तू तर ती सेक्सी सेल्फी अपलोड करुन धमाल उडवून दिली होतीस. मग पुढे काय झाले? तुला अशा चीप पब्लिसिटीची खरं तर गरज नव्हती, तू चांगला नाच करतेस. मग तरीही का फिनाले हरलीस?"

"हां यार! मोठी स्टोरी झाली ती!" सिगरेटचा धूर खालच्या बाजूला सोडत निराशेच्या स्वरात ती म्हणाली.

"अगं सोनी, हरलीस म्हणून सिगार प्यायला लागलीस? सोड ते! फेकून दे! मीही एके काळी ड्रग अॅडिक्ट झाले होते पण मी स्वतःवर नियंत्रण मिळवले! तूही सोड! या सगळ्या नाशेबाजीतून कोणतेच डिप्रेशन, कोणतीच निराशा दूर होऊ शकत नाही! मी स्वत: ते अनुभवलं आहे. आपले दु:ख शेअर करायला कुणी हक्काचं माणूस असलं की आपोआप आपला ताण हलका होतो. नशा हा त्यावर उपाय नाही!"

"हट! फुकटचा सल्ला नको आपल्याला! सौ चुहे खाकर बिल्ली मुझे व्हेजिटेरियन खाने का एडव्हाईस दे राही है? नो वे! साला, त्या सेल्फीमुळे सगळं उलटं झालं! त्या मॅडम अकॅडमी कडून पण मला वार्निंग मिळाली. हे बरं की सस्पेंड नाही झाले!!" असे म्हणून जळून संपलेली सिगार तीने डस्टबिन मध्ये टाकली.

"ओह, आणि फिनाले कशी हरलीस?"

"सांगते ऐक! ....

... फिनालेच्या शूटींगच्या आदल्या रात्री आम्ही डान्स शो मधील सगळे कंटेस्टंट, डायरेक्टर, असिस्टंट प्रोड्युसर आणि जज अशी सगळी टीम डिनरला गेलो होतो.

....त्यातला एक जज जेवतांना सारखा माझ्यावर नजर ठेऊन होता. माझ्यावर म्हणण्यापेक्षा सरळ सरळ माझ्या छातीवर नजर ठेऊन होता असे म्हटले तर जास्त योग्य होईल. बहुतेक माझी सेल्फी बघून त्याचं डोकं फिरलं असावं. कारण त्या दिवशी त्याने मला डान्स करतांना माझ्या अगदी तिन्ही डान्स परफॉरमन्सला डोळे झाकून (की उघडे ठेऊन?) पैकीच्या पैकी मार्क दिले होते....

... माझा पूर्ण परफॉरमन्स होईपर्यंत तो अगदी माझ्या प्रत्येक हालचालीकडे निरखून बघत होता. शरीराच्या प्रत्येक अंगाकडे अगदी लाळघोटेपणाने बघत होता. हे लक्षात यायला लागल्यावर मी खूप नर्व्हस होवून माझ्या डान्सच्या स्पेप्स चुकल्या. पण तरीही त्याने मला पूर्ण मार्क दिले."

"मग? चांगलं झालं की? काय इश्यू झाला पुढे?"

"मी सहजपणे सेक्ससाठी उपलब्ध आहे असं सेल्फी बघून त्याचं मत झालं असावं, कारण आजकाल या क्षेत्रात काही नव्या मुली पहिला ब्रेक मिळण्यासाठी काहीही करायला तयार होतात. तसं तो सेल्फी अपलोड मी करायला नकोच होता असे आता वाटते! ...

....त्या रात्री डिनर नंतर आम्ही सगळेजण हॉटेलच्या स्विमिंग पुलजवळ सहज फिरत असतांना त्याने कुणाला न कळू देता मला चालता चालता एकटं गाठलं!

....बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या. नंतर हळू आवाजात माझ्या कानाजवळ येऊन त्याने विचारलं की, आजच्या दिवसासारखं फेवर आणि फुल मार्क उद्या फायनलमध्ये सुद्धा हवे असल्यास आजची पूर्ण रात्र मी त्याच्यासोबत घालवायची! एकच रात्र! पुन्हा परत कधीही तो मला बोलावणार नव्हता!

... त्याला मी फक्त एकदाच हवी होते, पूर्ण आणि रात्रभर! आणि रात्री जे होईल ते बाकी कुणालाही कळू न देण्याची पूर्ण व्यवस्था आणि काळजी तो घेणार होता....

बुल शिट! ऑल मेन आर सेम!"

"मग? तू काय केलेस?"
 
"थोबाडीत मारली असती गं ... पण सगळी टीम थोड्या अंतरावरच होती! इश्यू झाला असता आणि आमच्या सगळ्या ग्रुपला कळले असते. उगाच नाही नाही ते आरोप, बदनामी झाली असती. मग मला दिसले की त्याने शॉर्ट बर्मुडा पँट घातलेली होती. मग मी कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीने वेगाने त्याच्या जांघेजवळ नखं टोचून एक जोरदार सडकून चिमटा घेतला आणि त्याच्या कानात पटकन एकच सांगितलं की मी विकाऊ नाही, काय करायचं ते कर साल्या! तो वेदनेने कळवळला पण अगदी हळूच ओरडला आणि हळूहळू कुणाला न समजेल असा त्याने हसत हसत तेथून काढता पाय घेतला. पण आतून तो वेदनेने कळवळत होता."

आता मात्र शांत असलेली रागिणी खळाळून हसायला लागली, "ओह गॉड! सोनी, यु आर अन युनिक आयटम! हॅट्स ऑफ टू यू! हा हा हा! तू एक बहुत बडा नमुना है!"

"हसतेस काय? आणि मग मी फायनल हरले. सेल्फीमुळे मला माझ्या गावातले तर वोट मिळाले नाहीतच पण अनेक शहरांतल्या लोकांचे भरपूर वोट मिळाले होते. फिनालेमध्ये मी अगदी चांगला डान्स केला त्यादिवशी! वाटले की शेवटी माझ्या डान्सची दखल घावीच लागेल सगळ्यांना आणि मी जिंकेनच!

...ऑडियन्स पण चीयर करत होती पण त्या जजने माझ्या डान्समध्ये अशा काही ओढून ताणून चुका शोधल्या की कुणालाच काही बोलता आले नाही. त्याच्या चेहऱ्यावर कालच्या घेतलेल्या जोरकस चिमट्याच्या वेदना जाणवत होत्या आणि ते पाहून खरेतर मला हसू आवारात नव्हते. पण त्याचा बदला त्याने चांगलाच घेतला...

...इतर जज सुद्धा सुरुवातीला संभ्रमात पडले पण त्यांनाही त्याने पटवून सांगितले की माझा डान्स कसा चुकला आणि कुठे चुकला! मला त्याच्या रात्रीच्या वागण्याबद्दल लगेच कंम्प्लेंट करणे शक्य नव्हते कारण माझी ती सेल्फी बघता माझ्यावर कुणी विश्वास ठेवला नसता आणि मला आणखी वाद वाढवून माझे नुकसान मला करून घ्यायचे नव्हते!"

"ओह! बडा चालाक निकला ये जज! चल जाने दे अभी! जो हुआ सो हुआ! और वो तेरा टाईमपास लव्हर साकेत, वो क्या कहता है सेल्फी के बारे में? तू फिनाले हार गयी ये पता है भी या नही उसे?"

"पता है! लेकीन वो मुझे कुछ नही बोलता. वो डरता है मुझसे, और प्यार भी करता है. मै उसे ज्यादा बोलने नही देती. उसे मुझपर पुरा विश्वास है! एक तोच तर आहे जो माझा सच्चा बॉयफ्रेंड आहे! तो मला समजून घेतो! तो मला पूर्णपणे समर्पित आहे. छोट्या मोठ्या नोकऱ्या करतो तो. माझ्या पैशांवर अवलंबून आहे, त्यावर चैन करतो तो!"

"बहोत ग्रेट है तू सोनी! तू और तेरा लव्हर साकेत, जोडी नंबर वन! और तेरी माँ क्या बोली? तुझी गावाकडची ती नौटंकी आई? काय म्हणाली ती? तिने पाहिला का तुझा सेल्फीवाला फोटो?"

"अगं तिने तर मला त्या सेल्फीमुळे कायमचे घराबाहेर आणि गावाबाहेर काढले. माझी सुटकेस घरून भरूनच आणली होती तिने! मात्र तिला महिन्याला माझ्याकडून पैसे पाहीजेत! सब लाईफ उलटपलट हो गया मेरा!"

"अरे डोन्ट वरी! पब्लिक की मेमरी शॉर्ट होती है! कुछ समय बाद लोग भूल जायेंगे. तुम भी भूल जाओगी. नया कुछ करो और आगे बढो! ये इंडस्ट्री बहोत बडी है मॅडम! अगर तुममें टॅलेंट है तो काम जरूर मिलेगा. चल समान बांधने में मदद कर मेरी! आज शाम को निकल रही हूँ मै!"

सूरजच्या फ्लॅटवर शिफ्ट झाल्यानंतर आपली कॅनडातील मैत्रीण गौरीला कॉल करून सूरजसोबतचे लिव्ह इन सांगायला रागिणी विसरली नाही.

गौरीला हे ऐकून हायसे वाटले....
 
वलय - प्रकरण १४

गोरेगांवच्या फिल्मसिटी स्टुडिओ मध्ये जिंतेन्द्र करमरकर खूप काळजी अणि चिंता करत बसला होता. त्याचे कशातच मन लागत नव्हते. समोर टेबलावर लॅपटॉप पडला होता त्यावर स्क्रीन सेव्हर चालू झाले होते आणि जितेंद्रच्या मनावर काळजीचे स्क्रीन सेव्हर चालू झाले होते.

त्याच्या काळजीचे कारण असे होते: "चार थापडा सासूच्या" ऎन रंगात आली असतांना आणि पुढील अनेक एपिसोड्सचे लिखाण स्क्रिप्टसह राजेशकडून लिहून तयार असतांना, अचानक सुप्रियाने फक्त एका एसेमेसद्वारे जितेंद्रला कळवले होते की ती त्या सिरियलशी असलेला करार तोडते आहे. ती सिरियल सोडते आहे!

मध्येच करार तोडल्यावर लागणारी नुकसान भरपाईसुद्धा ती द्यायला तयार होती.

अचानक काय झाले ते कळायला मार्ग नव्हता. कारण ती फोनसुद्धा उचलत नव्हती...

स्क्रिप्ट सुपरवायझर रोशन रोकडे समोर बसला होता. तोही त्याच्याजवळच्या लॅपटॉपवर आणि काही कागदांत डोके आणि डोळे खुपसून बसला होता.

"रोशन! मला काही समजत नाही, काय करायचे पुढे? राजेशला कॉल करावा तर तोही उचलत नाही आहे. पुढील तयार लिखाण आपल्याला पाठवून गावी जातांना तो गावी खुप बिझी असणार असे मला सांगून गेला होता!"

"त्याला कॉल करून फारसा फायदा नाही होणार!" रोशन लॅपटॉप वरून नजर हटवत म्हणाला.

"अरे मित्रा! मग काय करायचे? स्क्रिप्ट तर बदलावी लागणार असं दिसतंय! सिरियल मधल्या सूनेला मरावं लागणार बहुतेक! आपली सिरियल प्राईम टाईम मध्ये प्रसारित होते. लाखो लोक बघतात. लोक ओरडतील आपल्या नावानं. अनेक लोक फक्त सुप्रियासाठी ही सिरियल बघतात. या सुप्रियाचंही काही कळत नाही मला! काही पर्सनल प्रॉब्लेम असणार बहुतेक!"

प्रॉडक्शन कंपनीचा हेड बसला होता...
तो अमराठी होता. डी. के. रेड्डी.

रेड्डी म्हणाला, "तुमी त्या कलाकारला कोर्टात खेचला पाहीजे. आपल्याला संकटात टाकलं तिनं! करारानुसार जरी ती करार मोडल्याचे पैसे द्यायला तयार असली तरी, सिरीयल सोडण्याबद्दल किमान एक महिना आधी तिने सांगायला हवं होतं. फक्त वेळेवर एक एसेमेस पाठवला आणि संपलं? किती नॉन सेन्स आणि अनप्रोफेशनल!"

सुप्रियाला वाचवण्यासाठी जितेंद्र म्हणाला, "अं त्याची अजून गरज वाटत नाही, रेड्डी साहेब! सुप्रिया असं काही करेल असं मलापण वाटलं नव्हतं. मला वाटते प्रथम तिच्याशी संपर्क तर होऊ द्या मग बघू! काय वाटतं? आपण थोडं धीरानं घ्यायला हवं असं मला वाटतं ते बरोबर आहे ना सर? आणि रोशन तू काय म्हणतोस?"

रोशनने गप्प बसणे पसंत केले...

रेड्डीने तिरपे तोंड करून नाईलाजाने जितेंद्रशी संमत असल्यासारखे केले आणि म्हणाला, "ठीक आहे जित! पण तुझ्याकडे काय उपाय आहे? या रोशन कडे आहे का एखादी आयडिया? रोशन? तू याआधी दोन हिंदी सिरियल केल्या आहेस, सांग काय करायचं? सिरीयल ऐन रंगात आली असतानाच हे असं घडतंय!"

स्क्रिप्ट सुपरवायझर रोशन बराच वेळ विचार करून म्हणाला, "एक तोडगा आहे माझ्या मनात! सिरियलमध्ये सूनेचा म्हणजे सुप्रियाचा अॅक्सिडेंट होतो, चेहरा खराब होतो असे दाखवून नंतर डॉक्टर तिची प्लास्टिक सर्जरी करतात असे दाखवू. मग तिच्या ऎवजी दुसरी कलाकार घेऊ!"

"इतकं करण्यापेक्षा सरळ सूचना देऊन टाकू- आजपासून सूनेचा रोल नवी अभिनेत्री करणार!"

"नाही. एकदम नवी अभिनेत्री पब्लिक अशी डायरेक्ट आणि सहजासहजी स्वीकारणार नाहीत असं मला वाटतं!"

"मग? तुझ्या म्हणण्याप्रमाणे अॅक्सिडेंटच्या सीनसाठी तरी सुप्रिया आणायची कोठून?"

"मी सांगतो तसे करू. ते खूप सिंपल आहे. दोन जणांच्या बोलण्यात संवाद टाकायचा की सूनेचा अॅक्सिडेंट झाला. मग ते तिला बघायला हॉस्पिटलमध्ये पोहोचले की प्रेक्षकांना तिचा विद्रूप झालेला चेहराच डायरेक्ट दाखवायचा जी सुप्रिया नसेलच. हिंदी सिरियलमध्ये अनेकदा असं केलंय!"

रेड्डी आणि जितेंद्र म्हणाले, "वा! रोशन. क्या आयडीया है! मान गये! स्क्रिप्ट सुपरवाईझ करून करून डोकं भन्नाट चालायला लागलंय तुझं!"

रोशनने दिलेला सल्ला दोघांना पटला.

मूळ कथेत अचानक बदल करून सून स्कूटरवरून खाली पडते आणि चेहऱ्यावर आपटते. चेहरा खराब होतो, असे दाखवण्याचे ठरवले गेले. अर्थात सिरीयल मधले दोन पात्र फक्त तसे बोलतील की असे असे झाले.

हे तर कथेचे झाले, पण आता शोध सुरू होणार होता नव्या अभिनेत्रीचा!

जितेंद्रचा मूड आता थोडा पॉझिटिव्ह झाला होता.

तो म्हणाला, "नवा कलाकार मी निवडणार. माझ्या मनात एक विचार आलाय. आपण अगदी नवीन कलाकाराला घेऊ, जिने अजून कोणत्याच सिरीयल मध्ये काम केले नसेल. आपण अॅड फिल्म मधील एखादी मॉडेल घेऊ. नवा फ्रेश चेहरा जगासमोर आणू. सुप्रियाच्या सिरीयल सोडण्याने जे नुकसान झाले आहे असे आपल्याला वाटते आहे त्याचे आपण संधीत रुपांतर करू!"

रेड्डी, "नवीन मॉडेल? नको जितेंद्र! ती एक रिस्क ठरेल!"

जितेंद्र," नाही ठरणार! माझ्या मनात आहे एक मॉडेल! खरं तर ती माझ्या मनात सुनेच्या बहिणीच्या रोलसाठी होती जी अजून कथेत प्रवेश करणार आहे, पण तिलाच आता आपण सुनेचा रोल देऊया! आणि सुनेच्या बहिणीच्या रोल साठी नंतर बघू काहीतरी!"

रेड्डी, "ठीक आहे. आता करा बाबांनो लवकर काहीतरी आणि आणा रुळावर गाडी सिरीयलची लवकर!"

रोशन पण थोडा विचारात पडला आणि म्हणाला, "जित, सांगून टाक आता कोण ती नेमकी कलाकार? सांग! ताणू नकोस!"

जितेंद्रने लॅपटॉप पासवर्ड टाकून ओपन केला आणि त्यात एक व्हिडिओ प्ले केला आणि सगळ्यांना दाखवला:

एक मुलगी दंतमंजनने रात्री दात घासते...

पण घरातली लाईट जाते. आई वडील टॉर्च शोधायला धडपडतात पण त्यांना तो सापडत नाही.

अचानक सोळावर सोळा असे बत्तीस दिवे ओळीने चमकतात. ते असतात त्या मुलीचे चमकणारे दात!

मग दातांच्या उजेडात टॉर्च सापडते.

नंतर लाईट येते आणि ती मुलगी हातात "चमको दंतमंजन" घेते आणि म्हणते -

"रोज सकाळी झोपेतून उठल्यावर आणि रात्री झोपायच्या आधी तुमचे दात चमको दंतमंजन ने घासायचे विसरू नका हं!
चम चमा चम, चमको मंजन!"

मग घरचे सगळे मंजन हातात घेऊन नाचायला लागतात आणि शेजारपाजारचे लोक खिडकीतून हा डान्स पाहू लागतात..

जितेंद्र म्हणाला, "आता हीच मुलगी म्हणजे वैशाली विचारे आपली सिरीयल पण चमकावणार! मी सगळी चौकशी करून ठेवलीय.
फक्त तिच्याशी संपर्क साधून फायनल काय ते ठरवून टाकू! काय सांगता? कशी वाटली आयडीया?"
 
Back
Top